रोहित बनला नवा 'सिक्सर किंग'; ख्रिस गेलला टाकलं मागे
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माने इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 51 षटकार ठोकले आहेत. ख्रिस गेलने याआधी विश्वचषकाच्या इतिहासात 49 षटकारांची नोंद केली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्माने भारताला झंझावाती सुरुवात करून दिली आणि 4 षटकार मारून इतिहास रचला. याशिवाय रोहित शर्मा विश्वचषकाच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार
५१ - रोहित शर्मा
49 - ख्रिस गेल
43 - ग्लेन मॅक्सवेल
37- एबी डिव्हिलियर्स
37 - डेव्हिड वॉर्नर
दरम्यान, भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने जोरदार फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. परंतु, रोहित षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रोहित शर्मा 29 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. किवी कर्णधार केन विल्यमसनने रोहित शर्माचा झेल घेतला. यानंतर मैदानावर विरोट कोहली आणि शुभमन गिलने डाव सांभाळला आहे.