India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १२ जुलैपासून सुरू होत आहे. टीम इंडिया आपला नियमित कर्णधार रोहित शर्मासह वनडे मालिकेत मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र, यासाठी रोहित शर्माला किमान 5 षटकार मारावे लागतील. (rohit sharma can become first indian player in odi history)
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 245 षटकार मारले आहेत. जर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्या वनडे मालिकेत आणखी 5 षटकार ठोकले तर या फॉरमॅटमध्ये 250 षटकार मारणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरेल.
रोहित शर्मा याआधीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने 229 सामन्यात 245 षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे, ज्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 229 षटकार ठोकले.
आफ्रिदी आघाडीवर आहे
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. शाहिद आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 351 षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने 301 एकदिवसीय सामन्यांमध्ये 331 षटकार मारले असून तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचे नावही सामील आहे. सनथ जयसूर्याने 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 270 षटकार ठोकले.