India House : 2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये उभे राहणार ‘इंडिया हाऊस’
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांना (Olympic Games) खूप महत्वाचे मानले जाते. या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला हवी तशी कामगिरी करता आली नाही आहे. मात्र याच्या पुढे या स्पर्धेमध्ये भारतातील जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होतील आणि पदकांची कमाई करतील यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) हे एकत्र येत त्यांनी हातमिळवणी केली आहे. म्हणून आरआयएल आणि आयओए २०२४ ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये पहिले ‘इंडिया हाऊस’ (India House) स्थापन करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, “भारतीय ऑलिंपिक संघटनेसोबतच्या या भागीदारीबद्दल आणि भारतीय खेळांना समर्थन देण्यासाठी मी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांचे आभार मानतो. पॅरिसमध्ये भारताचे हाऊस, असणे ही एक महत्त्वाची बाब आहे.”
यासोबतच आयओसी सदस्य आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक नीता अंबानी म्हणाल्या, “भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात केंद्रस्थानी पाहणे, हे आमचे स्वप्न आहे. आयओए सोबतच्या भागीदारीतून रिलायन्स फाऊंडेशन देशातील तरूण खेळडूंना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. २०२४ मधील पॅरिस ऑलिंपिक गेम्समध्ये पहिल्या-वहिल्या इंडिया हाऊसचे यजमानपद भूषवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. भारताची अफाट प्रतिभा, क्षमता आणि आकांक्षा जगासमोर दाखवण्याची ही एक उत्तम संधी असेल.”