आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 1097 खेळाडूंची नोंदणी, 18 तारखेला लिलाव
लोकशाही न्यूज नेटवर्क
दुबईमध्ये आयपीएलचा 13वा हंगाम रंगला होता. त्यापाठोपाठ आता आयपीएलच्या 14व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या हंगामासाठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात 207 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेसाठीची लिलावप्रक्रिया 18 फेब्रुवारी होईल.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या 21 क्रिकेटपटूंचा या लिलावात समावेश आहे. तर, आपल्या देशातील वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले नाही, असे 863 खेळाडू असून यात 743 भारतीय आणि 68 विदेशी खेळाडू आहेत.
देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या पण, एक आयपीएल सामना खेळलेल्या 50 खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. या यादीत दोन विदेशी खेळाडूंचादेखील समावेश आहे. प्रत्येक फ्रेंचायझीने आपापल्या संघात कमाल 25 खेळाडू ठेवले, तर लिलावात 61 खेळाडू खरेदी केले जातील (त्यातील 22 विदेशी खेळाडू असू शकतात). आतापर्यंत आठ संघांनी मिळून एकूण 139 खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर एकूण 57 खेळाडूंना मुक्त केले आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब 53.20 कोटी रुपयांसह लिलावात सहभागी होईल. त्याखालोखाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (35.90 कोटी), राजस्थान रॉयल्स (34.85 कोटी), चेन्नई सुपर किंग्ज (22.90 कोटी), मुंबई इंडियन्स (15.35 कोटी), दिल्ली कॅपिटल्स (12.9 कोटी) आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद (दोन्ही 10.75 कोटी) असे संघ आहेत.