भारत मजबूत स्थितीत…इंग्लंड दिवसाअखेर ३ बाद ५३
लोकशाही न्यूज नेटवर्क
चेन्नईत सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस सामन्यावर मजूबत पकड मिळवली आहे. आज दिवसाअखेर भारताच्या ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंचे ५३ धावांवर ३ बळी गेले आहेत. आर अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर आज टीम इंडियाचा दुसरा डाव २८६ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली आणि अश्विनने ९६ धावांची भागीदारी केली.
यानंतर यजमानांनी फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर सलामीवीर डॉम सिबली (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीचने शून्यावर अक्षरला आपली विकेट बहाल केली. सध्या डॅन लॉरेन्स १९ धावांवर तर जो रूट २ धावांवर खेळत आहेत. उद्या सामन्याचा चौथा दिवस आहे. त्यामुळे निर्णायक टप्प्यावर सामना आल्याचं चित्र आहे.
दुसऱ्या दिवशी सलामीवीर शुबमन गिल(१४) बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी रविचंद्रन अश्विन यांनी खेळपट्टीवर तग धरला आणि भारताच्या डावाला आकार दिला.
पहिल्या डावात रोहित शर्माच्या १६१ धावांच्या जोरावर भारताने ३२९ धावांवर मजल मारली होती. यानंतर गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. यानंतर आता दुसऱ्या डावा अखेरीस भारत पुन्हा मजबूत स्थतीत पोहोचला आहे.