Tokyo 2020 Hockey: हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी १ कोटी
टोकिओ ऑलीम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीविरुद्ध कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.भारतीय खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर पंजाब सरकारने मोठी घोषणा केली. हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये रोख पुरस्कार जाहीर केला आहे.पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंह यांनी ही घोषणा केली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने प्ले-ऑफ सामन्यात जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. सिमरनजीत सिंगच्या दोन गोलमुळे भारताला हा थरारक सामना जिंकता आला. या विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकिओ ऑलिम्पिकमध्ये जर्मनीविरुद्ध कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी देशभरातून भारतीय पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन करण्यात येत आहे.
या प्रसंगी राणा गुरमीत सिंह सोढी यांनी संघाच्या पंजाबच्या खेळाडूंना १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. राणा गुरमीत सिंह सोढी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. "भारतीय हॉकीच्या या ऐतिहासिक दिवशी, संघाच्या पंजाबच्या खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आम्ही तुमच्या परत येण्याची वाट पाहत आहोत जेणेकरून तुम्ही तुमचा हा विजय साजरा करू शकाल," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.