पृथ्वीची ‘शॉ’नदार खेळी; मुंबईचा उपांत्य फेरीत प्रवेश
गेल्या अनेक महिन्यापासून टीकेचा धनी ठरलेल्या पृथ्वीची शॉ ने विजय हजारे चषकात आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. पृथ्वी शॉने यशस्वी जैस्वालच्या सोबत पहिल्या विकेटसाठी 238 धावांची खेळी करत सौराष्ट्रचा पराभव करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे आता मुंबईने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबई विरुद्ध सौराष्ट्र असा सामना रंगला होता. या सामन्यात सौराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत 284 धावा केल्या होत्या.या धावसंख्येमध्ये विश्वराजसिंह जडेजा आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी 53 तर समर्थ व्यासने सर्वाधिक म्हणजेच नाबाद 90 धावांचे योगदान दिलं.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पृथ्वी शॉने यशस्वी जैस्वालच्या सोबत पहिल्या विकेटसाठी 238 धावांची खेळी केली. पृथ्वीने 123 चेंडूंमध्ये 185 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 21 चौकार आणि सात षटकार लगावले. यशस्वी 104 चेंडूत 75 धावा करुन बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान 10 चौकार आणि एक षटकार लगावला. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर आदित्य तरे ने नाबाद 20 धावा केल्या. या धावसंख्येमुळे आठ षटकं शिल्लक असतानाच मुंबई संघाने विजय मिळवला.