IPL 2024 : 'या' दिग्गज खेळाडूची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी वर्णी, एडन मार्करमची केली हकालपट्टी
आयपीएलचा १७ वा हंगाम २२ मार्चपासून सुरु होणार असून प्रत्येक संघातील खेळाडू मैदानात कंबर कसत आहेत. प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्यासाठी संघाच्या कर्णधारांकडून रणनीती आखली जात आहे. तर काही संघांमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधारपदासाठी बदलाचे वारू फिरू लागले आहेत. मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा आगामी होणाऱ्या आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्व करताना दिसणार नाही. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाने एडन मार्करमला कर्णधारपदावरून बाहेर काढल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची सनरायझर्स संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे. याबाबत एसआरएच संघाने सोशल मीडियावर अधिकृतपणे घोषणा केलीय.
गतवर्षी झालेल्या आयपीएल हंगामात एडन मार्करमकडे सनरायझर्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, त्याच्या नेतृत्वात या संघाला अपेक्षित असं यळ मिळालं नाही. १४ सामन्यांमध्ये सनरायझर्सला १० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता आलं नाही.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार पॅट कमिन्सकडे एसआरएचची जबाबदारी सोपण्यात आलीय. आयपीएलच्या लिलावात कमिन्सला सनरायझर्सने २०.५० कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बोली लावलेल्या कमिन्सपुढं सनरायझर्सला आयपीएलचं जेतेपद जिंकून देण्याचं तगडं आव्हान असणार आहे.