Paralympics| पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिकमधील विजेत्यांशी केली फोन पे चर्चा
टोक्यो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या अवनी लखेरा हीनं नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक इतिहासातील भारताचं नेमबाजीतील पहिलं पदक आहे. या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एक एक करून त्यांनी विजेत्यांशी संवाद साधला. भारताला सोमवारी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळालं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ७ वर पोहोचली आहे.
अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनी लेखरा हिला फोन करत शुभेच्छा दिल्या. हा विजयाचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असं त्यांनी अवनीला सांगितलं.
अवनी लेखरा प्रमाणेच पंतप्रधान मोदी यांनी त्यानंतर रौप्य पदक विजेत्या योगेश कथुरियाला फोन केला आणि त्याचं अभिनंदन केलं. योगेशला इथपर्यंत पोहोचवण्यास त्याच्या आईची मोलाची साथ आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगेशच्या आईचेही आभार मानले. योगेशनेही पंतप्रधान मोदींचे शुभेच्छा दिल्याप्रकरणी आभार मानले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र झंझारिया आणि सुंदर सिंह गुर्जर यांना फोनवरून पदकाच्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्रशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी "तुम्ही महाराणा प्रतापच्या भूमीतून आहात. तुम्ही भालाफेकीत चांगली कामगिरी करत आहात.",अशा शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे सुंदरलाही पंतप्रधान मोदी यांनी सुंदर काम केल्याची उपमा दिली. यावेळी दोन्ही खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले.