स्वप्निल कुसाळेला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! नोकरीत मिळाले प्रमोशन, मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. नेमबाज स्वप्नील कुसळेने 50 मी. रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटात कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्रासाठी स्वप्निलचं हे यश खास आहे. कारण कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणारा स्वप्निल हा पहिलाच खेळाडू आहे. रेल्वेत नोकरी करण्यापासून ते ऑलिम्पिक विजेतेपद मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवासही रंजक आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुसाळे याला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले असताना आता मध्य रेल्वेने देखील त्याला नोकरीत प्रमोशन दिले आहे.
कोल्हापूरातील नेमबाज स्वप्निल हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट तपासक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने देखील स्वप्निलच्या कामगिरीवर आपण प्रचंड अभिमान बाळगतो असं म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे. आता स्वप्नील कुसाळे याला सीएसएमटी हेडक्वॉर्टरमधील स्पोर्ट्स सेलमध्ये ऑफीसर ऑन स्पेशल ड्यूटी (OSD) म्हणून बढती देण्याचे आदेश मध्य रेल्वेने काढले आहेत. कॉंग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्वप्नील याचे कौतूक करीत पाच लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.