Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये नोवाक जोकोविचची 'सुवर्ण' भरारी, अल्काराजचा पराभव करून जिंकलं 'गोल्ड' मेडल
Paris Olympic 2024 Todays Update: क्रीडा विश्वात पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची रणधुमाळी सुरु असून आज नोवाक जोकोविचने सुवर्ण कामगिरी करुन इतिहास रचला. सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्काराज यांच्यात टेनिसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढत झाली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये रंगलेल्या अतितटीच्या सामन्यात ३७ वर्षीय जोकोविचने बाजी मारली. नोवाकने ७-६,७-६ अशी आघाडी घेत या सामन्यात विजय मिळवला आणि सुवर्ण पदक जिंकून सर्बियासाठी मानाचा तुरा रोवला.
त्यामुळे सर्बियाला पहिलं सुवर्णपदक मिळालं असून स्पेनच्या अल्काराजला रौप्य पदकापर्यंत मजल मारता आली. नोवाक आणि अल्काराज यांच्यात २ तास ५० मिनिटांचा सामना रंगला. यावेळी अल्काराजने सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली. या सामन्यातील पहिला सेट ९४ मिनिटांचा झाला. दोन्ही सेटमध्ये ट्रायबेकर झाला, पण जोकोविचने शर्थीचे प्रयत्न करून हा ट्रायबेकर जिंकला आणि सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.