भारताचा गोल्डन पंच! नीतू-स्वीटीचे सुवर्ण यश
नवी दिल्ली : येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी अप्रतिम कामगिरी केली आहे. 25 मार्च रोजी दोन भारतीय बॉक्सर सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घनघास हिने 48 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, बॉक्सर स्वीटी बुराने 81 किलो वजनी गटात सुवर्ण यश मिळवले आहे.
22 वर्षीय नीतू घनघासने अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्साईखान अल्तानसेतसेगचा 5-0 असा पराभव करून किमान वजन गटात सुवर्णपदक जिंकले. तर 30 वर्षीय स्वीटीने लाइट हेवीवेट प्रकारात चीनच्या वांग लीनाचे आव्हान मोडून काढत 4-3 असा विजय मिळवून भारताला दुहेरी यश मिळवून दिले.
दरम्यान, भारताला आज दोन सुवर्णपदके मिळण्याची आशा आहे. निखत जरीन (50 किलो) आणि लोव्हलिना बोरगोहेन (75 किलो) वजन गटांच्या अंतिम फेरीत लढणार आहेत. अंतिम फेरीत लोव्हलिनाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्कशी होईल. तर निखत जरीनचा सामना दोन वेळा आशियाई चॅम्पियन न्गुयेन थी टॅम (व्हिएतनाम)शी होणार आहे.