Video : सिराजला हिरोगिरी दाखवत होता बॅटसमन; पुढच्याच बॉलवर काढली हवा
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीची १६६ धावांची खेळी संस्मरणीय ठरली. तर दुसरीकडे मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या सामन्यात सिराजने 4 बळी घेतले. परंतु, त्याच्या एका विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
12व्या षटकातील चौथा बॉल सिराजने श्रीलंकेच्या सलामीवीर चमिका करुणारत्नेला टाकला. यावर करुणारत्नेने सरळ बॅटने शॉट खेळला. त्यामुळे बॉल थेट सिराजपर्यंत पोहोचला. याचवेळी सिराजने बॉल पकडला आणि तो फलंदाजाच्या स्टंपच्या दिशेने फेकला. मोहम्मद सिराज एवढ्या वेगाने रिअॅक्ट करेल हे फलंदाजालाही समजले नाही.
थ्रो मारल्यानंतर सिराजला खात्री होती की फलंदाज रनआउट झाला. खेळपट्टीवर उभा असलेला फलंदाज कसा रन आऊट होऊ शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्याच वेळी, थर्ड अंपायरला अनेक वेळा रिप्ले पाहावा लागला. यावेळी फलंदाजाचा पाय क्रीज लाइनच्या मागे राहिला असल्याचे दिसून आले व अंपायरने बॅट्समनला रन आऊट दिला.
हा निर्णय येताच भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह संचारला. विशेषतः विराट कोहलीची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. हा बॉल टाकण्यापूर्वी सिराज आणि फलंदाज चमिका करुणारत्ने यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर लगेचच सिराजने अनोख्या पद्धतीने करुणारत्नेला आऊट केले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताच्या 390 धावाच पाठलाग करताना अवघ्या, 73 धावांवर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला. त्यामुळे श्रीलंकेचा 371 धावांनी पराभव झाला. या विजयासह भारताने श्रीलंकेला क्लीनस्वीप दिला आहे. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताचा श्रीलंकेवर विजय सोपा झाला.