IND vs ENG : कुलदीपच्या फिरकीची जादू! पंजा उघडून भारताच्या माजी कर्णधाराचा ४५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील अखेरचा पाचवा सामना धरमशाला येथे सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजांसाठी धरमशाला मैदानातील खेळपट्टी पोषक असल्याचा अंदाज वर्तुवण्यात आला होता. पंरतु, पहिल्याच दिवशी फिरकी गोलंदाजीने बाजी मारली. कारण इंग्लंडचे सुरुवातीचे तीन विकेट्स भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने घेतले. कुलदीपने इंग्लंडविरोधात फिरकीचा जलवा दाखवत पाचव्या कसोटी सामन्यात पंजा उघडला आणि या मैदानात इतिहास रचला. त्यामुळे कुलदीप भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणऱ्यांमध्ये १७ वा खेळाडू बनला आहे. दरम्यान, कुलदीपने भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा ४५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
बिशन सिंग बेदी यांनी ७७ सामन्यांमध्ये एकूण २७३ विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती. अशात कुलदीपने इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात सुरुवातीला दोन विकेट्स घेतल्याने या विक्रमाला गवसणी घातली. कुलदीपने आतापर्यंत १५० सामने खेळले असून २७५ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केलीय.
इंग्लंडचे सलामीचे फलंदाज झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन दोघांनाही तंबूत पाठवलं. कुलदीपने फिरकीची जादू दाखवत क्राऊलीला ७९ तर डकेटला २७ धावांवर बाद केलं. रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या टॉम हार्टले (६), मार्क वूड (0) आणि जेम्स एंडरसनला (0) आणि फोक्सला २४ धावांवर बाद करून करून तीन विकेट घेतल्या. तसंच रविंद्र जडेजाने जो रुटला २६ धावांवर असताना बाद केलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ५७. ४ षटकात २१८ धावांवर सर्वबाद झाला.