Duleep Trophy: केएल राहुल आणि आकाश दीपची दमदार खेळी आली नाही कामी; भारत ब 76 धावांनी विजयी
रविवारी शेवटच्या दिवशी भारत ब संघाने भारत अ संघावर 76 धावांनी शानदार विजय नोंदवला. केएल राहुल आणि आकाश दीप यांनी चौथ्या दिवशी शानदार खेळी करत लक्ष्याचा पाठलाग करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.
शेवटच्या दिवशी 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाने शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल या सलामीवीरांच्या विकेट लवकर गमावल्या. पण केएल राहुल आणि रियान पराग यांनी महत्त्वाच्या धावा करत सामन्यात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. KL 121 चेंडूत 57 धावा करत सर्वाधिक धावा करणारा ठरला आणि त्यानंतर आकाश दीपने 43 धावांची जलद खेळी खेळली पण भारत ब च्या वेगवान गोलंदाजी विरुद्ध तो अपयशी ठरला.
दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ब संघ दुसऱ्या डावात 184 धावांत आटोपला आणि एकूण 274 धावांची आघाडी घेतली. मयंक अग्रवाल (3 धावा) दुसऱ्याच षटकात बाद झाल्याने भारत अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रियान पराग (31 धावा) क्रीझवर आला आणि त्याने शुभमन गिल (21 धावा) सोबत 48 धावांची भागीदारी केली.
गिल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल (0)ही कोणतेही योगदान न देता बाद झाला. उपाहाराच्या वेळी त्यांची धावसंख्या चार विकेट्सवर 76 धावा होती, जी शिवम दुबे आणि तनुष कोटियन बाद झाल्यानंतर लवकरच सहा विकेट्सवर 99 धावा झाली. राहुलने 180 मिनिटे फलंदाजी करताना 121 चेंडूंचा सामना केला. त्याने कुलदीप यादव (14) सोबत सातव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करून संघाचा पराभव काही काळासाठी टाळला. आकाश दीपने खालच्या फळीत 43 धावांची खेळी खेळली, पण संघाला लक्ष्य गाठता आले नाही. तत्पूर्वी, भारत ब संघ सहा विकेट्सवर 150 धावांवर खेळताना केवळ 34 धावा जोडू शकला.