Jeremy Lalrinnunga Gold Medal CWG 2022 : कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक
Jeremy Lalrinnunga Gold Medal CWG 2022 : भारताला राष्ट्रकुल 2022 मधील पाचवे पदक मिळाले आहे. जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 67 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमी लालरिनुंगाने स्नॅचमध्ये विक्रमी 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. म्हणजेच, एक गेम्स रेकॉर्ड करत त्याने एकूण 300 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. (Jeremy Lalrinnunga Gold Medal CWG 2022)
क्लीन आणि जर्क फेरीदरम्यान जेरेमी लालरिनुंगा दोन वेळा जखमी झाला पण त्याने हार मानली नाही आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सामोआच्या वापवा नेवोने रौप्य आणि नायजेरियाच्या ए. जोसेफने कांस्यपदक जिंकले. विशेष बाब म्हणजे कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारताला वेटलिफ्टर्सकडून आतापर्यंत पाच पदके मिळाली आहेत. टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात तर बिंदियाराणी देवीने महिलांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. याशिवाय 61 किलो वजनी गटात गुरूराजा पुजारी याने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले.
जेरेमीने 2018 उन्हाळी युवा ऑलिंपिकमध्ये मुलांच्या 62 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. जेरेमीने स्नॅच राउंड 124 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 150 किलो वजन उचलले. म्हणजेच जेरेमीने एकूण 274 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते. यासह जेरेमी युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर जेरेमीने आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले.
गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकले
19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगा याने गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमधील पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत जेरेमी लालरिनुंगा याने ३०५ किलो वजन उचलून हे सुवर्ण यश संपादन केले. 2018 युवा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लारिनुंगाने स्नॅचमध्ये 141 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 164 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला.