यंदाचा आयपीएल ( IPL) हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या (AHMADABAD) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (NARENDRA MODI STADIUM) २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत संध्याकाळचे सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होत होते, मात्र अंतिम सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार असल्याने वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात गेल्या दोन IPL मध्ये उद्घाटन किंवा समारोप समारंभ झाला नव्हता, पण यावेळी मात्र BCCI ने समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल फायनलपूर्वी २९ मे रोजी समारोप सोहळा सुरू होईल. संध्याकाळी साडेसहा वाजता समारोप सोहळा सुरू होणार आहे. त्यात अनेक बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार आहेत. हा सोहळा सुमारे ५० मिनिटांचा असेल. यानंतर नाणेफेक सुमारे साडेसात वाजता होईल आणि अंतिम सामन्याला रात्री ८ वाजता सुरूवात होईल.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलचे सर्व लीग सामने मुंबई आणि पुण्यात खेळले गेले. परंतु प्ले-ऑफचे सर्व सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. क्वालिफायरचे सामने कोलकातामध्ये आणि एलिमिनेटर व फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. तेथेच समारोप सोहळा रंगणार असून त्यासाठीची सर्व तयारी सुरू आहे.