VIDEO: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा धमाका! १३ चेंडूत ठोकलं अर्धशतक, मैदानात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Shafali Verma Batting Video: महिला आशिया चषक २०२४ चा १० वा सामना भारत आणि नेपाळच्या महिला संघात रंगला. हा सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कारण भारताच्या या लेडी सेहवागने ४८ चेंडूत १६८. ७५ च्या स्ट्राईक रेटने ८१ धावांची वादळी खेळी केली. या इनिंगमध्ये शेफालीनं १२ चौकार आणि १ षटकार ठोकला. मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून शफालीनं एकूण ५४ धावा कुटल्या.
शेफालीची तुफानी खेळी, भारतानं केल्या १७८/3 धावा
नेपाल विरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ८२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात ३ विकेट्स गमावून १७८ धावांपर्यंत मजल मारली. शफालीसोबत हेमलतानेही ४२ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीनं २८ धावांची नाबाद खेळी केली.
नेपाळचा झाला दारुण पराभव
भारताने दिलेल्या १७९ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळ संघाची दाणादाण उडाली. नेपाळने २० षटकांत ९ विकेट्स गमावून ९६ धावा केल्या. नेपाळसाठी सलामी फलंदाज सीता राणा मगरने २२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीनं १८ धावांची खेळी केली. याशिवाय बिंदू रावलने नाबाद १७, रुबीना छेत्रीने १५ आणि कर्णधार इंदू बर्माने १४ धावांचं योगदान दिलं. भारतासाठी दिप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डीला प्रत्येकी दोन विकेट घेण्यात यश आलं.