IND vs SL 3rd T-20: भारताचा श्रीलंकेविरुद्ध Super Over मध्ये विजय; मालिका 3-0 ने जिंकली
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T-20 मालिकेतील अंतिम सामना पल्लेकेले येथे खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. श्रीलंकेने भारताला तीन धावांचे लक्ष्य दिले होते. सूर्यकुमार यादवने सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या. अशा प्रकारे सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिस आणि कुसल परेरा प्रथम फलंदाजीला आले. त्याचवेळी भारतीय संघाकडून कर्णधाराने चेंडू वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवला. सुंदरने षटकाची सुरुवात वाईडने केली आणि धावसंख्या 1/0 झाली. पहिल्या चेंडूवर मेंडिसने धाव घेतली आणि धावसंख्या 2/0 झाली. दुसऱ्या चेंडूवर सुंदरने परेराला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले आणि धावसंख्या 2/1 झाली. यानंतर पथुम निसांका फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर सुंदरनेही विकेट घेतली. त्याने निसांकाला रिंकू सिंगकडे झेलबाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेची धावसंख्या 2/2 झाली आणि भारताला केवळ तीन धावांचे लक्ष्य मिळाले.
सुपर ओव्हरमध्ये तीन धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल मैदानात उतरले. पहिला चेंडू महिष तेक्षानाने टाकला ज्यावर सूर्यकुमार यादवने जोरदार चौकार मारून सामना जिंकला.