Ind Vs Eng : भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा… इंग्लंडची मुख्य फळी गारद
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने स्वतची पकड मजबूत करत इंग्लंडचे दिग्गज फलंदाज तंबूत माघारी धाडले आहेत. भारताने पहिल्याच दिवशी जोरदार फलंजादी करत त्रिशतकी खेळी केली. यामध्ये रोहित शर्माने केलेल्या १६१ धावांच्या जोरावर भारताला ३२९ धावसंख्या गाठता आली. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाअखेरीस ८ बाद ११८ धावसंख्येवर संघाला रोखलं आहे. त्यामुळे तिसऱ्या सत्रात भारत मजबूत स्थितीत आहे.
भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं रॉरी बर्न्स याला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर आर. अश्विन यानं सिब्ली आणि लॉरेन्स यांना बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं जो रुट याला बाद करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अक्षर पटेल लगेच तंबूत परतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारतानं चार गडी गमावले. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र, त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतनं दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीनं सर्वाधिक चार बळी घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन यानं तीन बळी घेत भारतीय संघाला अडचणीत टाकलं. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली.