Ind vs Aus WTC final : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची आघाडी; इंडिया बॅकफूटवर
नवी दिल्ली : लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 3 बाद 327 धावा केल्या आहेत. यामध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने 146 धावांचे योगदान दिले आहे. यानुसार अंतिम सामन्यात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड पहिला फलंदाज ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ नाबाद 95 आणि ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर नाबाद आहे. हे दोघेही आज खेळाला सुरुवात करतील. मार्नस लबुशेनची विकेट पडल्यानंतर हेड 25 व्या षटकात क्रीजवर आला आणि येताच हेडने जोरदार फलंदाजी सुरू केली. दिवसअखेरीस हेडने 156 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 146* धावांची वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाज उतरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज फारसे प्रभावी ठरू शकले नाहीत. वेगवान गोलंदाजांना केवळ 3 बळी घेता आले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 20 षटके टाकली, ज्यात त्याने 77 धावांत 1 बळी घेतला.
याशिवाय शार्दुल ठाकूरने 18 षटकात 75 धावा देत 1 बळी घेतला आहे. त्याचवेळी मोहम्मद सिराजने 19 षटकात 67 धावा देत 1 बळी घेतला. अशाप्रकारे वेगवान गोलंदाजांना पहिल्या दिवशी विशेष काही कामगिरी दाखवता आली नाही. त्याचवेळी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड १४६* आणि स्टीव्ह स्मिथ ९५* धावा करून परतले. या दोन्ही कांगारू फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसत होते.