मोठी बातमी! भारताची सेमी फायनलमध्ये धडक; दक्षिण आफ्रिका पराभूत
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकामध्ये रविवारी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. या निकालासह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. आता गट 2 मधून उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोणता असेल? हा निर्णय पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर घेतला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने गट-१ चे संपूर्ण समीकरणच बदलून गेले आहे.
भारतीय संघाचा शेवटचा गट सामना आज झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी महत्वाचे मानले जात होते. परंतु, आता भारतीय संघ हा सामना हरला तरी तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. कारण भारतीय संघ सध्या आपल्या ग्रुप-2 मध्ये 6 गुणांसह अव्वल आहे. तर आफ्रिका संघ ५ गुणांसह बाद झाला आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लवकरच सामना होणार आहे. हे दोन्ही संघ ४-४ गुणांनी बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत, या दोघांपैकी कोणताही संघ सामना जिंकेल, तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
सुपर संडेची सुरुवात आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील सामन्याने झाली आहे. हा सामना दक्षिण अफ्रिका जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दाट संधी होती. कारण नेदरलँड्सचा संघ तुलनेने कमकुवत होता. पण, आफ्रिकन संघाला पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. या सामन्यात नेदरलँड्सने 20 षटकात 158 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. आफ्रिकेचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावाच करू शकला आणि 13 धावांनी सामना गमावला. नेदरलँड्सच्या संघाकडून कॉलिन अकरमनने 26 चेंडूत 41 धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.