India-England ODI Series : पंत, हार्दिक पंडयाच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा विजय
भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच गडी आणि ४७ चेंडू राखून मात केली. भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी करत विजय मिळवला आहे. ऋषभ पंतचे दमदार शतक आणि हार्दिक पंडयाच्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर भारताने हा विजय मिळवला.
जसप्रीत बुमराच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही न उघडता बाद केले. मग सलामीवीर जेसन रॉय (४१), बेन स्टोक्स (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६०) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेले २६० धावांचे आव्हान भारताने ४२.१ षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाची ४ बाद ७२ अशी स्थिती होती. मात्र, पंत (११३ चेंडूंत १६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १२५ धावा) आणि पंडय़ा (५५ चेंडूंत १० चौकारांसह ७१) यांनी पाचव्या गडय़ासाठी १३३ धावांची निर्णायक भागीदारी रचल्यामुळे भारताला विजय मिळवण्यात यश आले.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांत २५९ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर जेसन रॉय (४१), बेन स्टोक्स (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६०) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, या तिघांनाही पंडय़ाने माघारी धाडले. त्यानंतर मोईन अली (३४), लियाम लिव्हिंगस्टोन (२७) आणि क्रेग ओव्हरटन (३२) यांनी काही काळ खेळपट्टीवर टिकाव धरल्याने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला.