India vs West Indies : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका शुक्रवार 22 जुलैपासून सुरू झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा पराभव केला आहे. भारताने 3 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेनच्या धुवाधार खेळी केली. त्यामुळे हा सामना चांगलाच रोमांचक झाला. फक्त 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीजचा पराभव झाला.
प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. सामन्यात रोमारीयो शेफर्डच्या धुवांधार खेळी करत सामना रोमांचक केला पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेफर्डने 25 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 39 धावा केल्या. त्याच्यासह अकील हुसेननेही नाबाद 33 धावांचे योगदान दिले. वन डेमधील वेस्ट इंडिजचा हा सलग सातवा पराभव आहे.
भारताकडून शिखरचे शतक हुकले
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत वेस्ट इंडिजसमोर तगडे आव्हान ठेवले. शिखर धवन आणि शुभमन गिल या जोडीने दमदार फलंदाजी करत शतकी भागिदारी केली. शुभमन 64 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयसने 54 धावा केल्या.