भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी दणदणीत विजय
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या पहिला सामन्यात भारताने इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडला 251 धावात गुंडाळले. यामध्ये पदार्पण करणाऱ्या प्रसिध कृष्णाने 54 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले.
भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली.14व्या षटकापर्यंत बिनबाद इंग्लंडने 135 धावा केल्या. त्यानंतर कृष्णाने रॉयला माघारी धाडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट साजरी केली. रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रॉयनंतर मैदानात आलेल्या बेन स्टोक्स 1 धावावर बाद झाला. इंग्लंडकडून बेअरस्टोने एकाकी झुंज दिली असे म्हणता येईल. त्याने 66 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 94 धावांची खेळी केली. त्यांनतर इयन मॉर्गन 22, जोस बटलर 2, सॅम बिलिंग्स 18, मोइन अली 30, सॅम कुर्रन 12, टॉम कुर्रान 11, मार्क वूड 2 तर अदिल रशिदने 0 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ 42 ओव्हरमध्ये 251 धावावर आटोपला.