पाकिस्तानी फॅन भारताला ट्रोल करत होते, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली त्याची बोलती बंद
काल ऑस्ट्रेलियामधे हाय होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. मात्र, या सामानाची चर्चा आजही होत आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये, भारताने सुपर-12 टप्प्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून आपल्या स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या या मॅचमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी चमत्कार केला. सामन्यानंतर अनेक आश्चर्यकारक प्रतिक्रिया आल्या आणि सर्वांनी पाकिस्तानला जोरदार ट्रोल केले. विशेष म्हणजे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत-पाकिस्तान सामन्यावर एका पाकिस्तानी चाहत्याची खिल्ली उडवली.
सुंदर पिचाई यांनी सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत-पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या तीन षटकांचा उल्लेख केला. या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून एका पाकिस्तानी चाहत्याने सुंदर पिचाई यांना पहिले तीन षटके पाहण्याचा सल्ला दिला, ज्यामध्ये केएल राहुल-रोहित शर्मा बाद झाले. यानंतर सुंदर पिचाई यांनी दिलेले उत्तर आश्चर्यकारक होते.
सुंदर पिचाई यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, दिवाळीच्या शुभेच्छा, मला आशा आहे की प्रत्येकजण आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करत असेल. शेवटची तीन षटके पाहून मी ही दिवाळी साजरी केली, किती छान सामना आणि कामगिरी. दिवाळीच्या शुभेच्छा.
या ट्विटवर एका पाकिस्तानी युजरने उत्तर दिले की, तुम्ही पहिले तीन ओव्हर्स पहा. यावर सुंदर पिचाई यांनी लिहिले की, मी तेही पाहिले आहे, भुवनेश्वर आणि अर्शदीप सिंग यांनी अप्रतिम जादू केली. पाकिस्तानी यूजर इथे टीम इंडियाला ट्रोल करत होते, पण सुंदर पिचाई यांनी पाकिस्तानी इनिंगची आठवण करून देत त्या ट्रोलर ट्रोल केले.