आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मोठा धक्का! पाकिस्तान वनडेत नंबर वन
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले. भारताने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. मात्र, या विजयानंतरही भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा वनडेत नंबर वन संघ बनला आहे.
आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये तळाला असलेल्या पाकिस्तानने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेने 122 धावांनी शानदार विजय नोंदवला आणि एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकदिवसीय संघात नंबर वन बनण्यात यशस्वी झाला.
आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे रँकिंग 114.659 आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाचे रेटिंग 114.889 आहे. आशिया चषकानंतर टीम इंडिया 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मायदेशात मालिका खेळणार आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघ अव्वल स्थान गाठू शकतो. त्याचबरोबर या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.
दरम्यान, भारतीय संघ आयसीसी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला टेस्टमध्ये 118 तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 264 रेटिंग आहे.