ICC Player of the Month Award; आयसीसीच्या नामांकनात रविचंद्रन अश्विनचे नाव
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले आहे. यामध्ये टीम इंडियाकडून अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, इंग्लंडकडून कर्णधार जो रुट आणि वेस्ट इंडिजच्या काइल मेयर अशा 3 खेळाडूंची नावे आहेत. त्यामुळे या पुरस्कारावर कोण बाजी मारतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. यामध्ये टीम इंडिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा समावेश आहे. टीम इंडियाकडून अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, इंग्लंडकडून कर्णधार जो रुट आणि वेस्ट इंडिजच्या काइल मेयर यांना नामांकन मिळालं आहे.आयसीसी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जो रुटला नामांकन मिळण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.
आयसीसीच्या नामांकन जाहीर केलेल्या खेळाडूंनी फेब्रुवारी महिन्यात शानदार कामगिरी केली. जो रुटने टीम इंडिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील सामन्यात 218 धावा केल्या आहेत. तसेच त्याने तिसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेण्याची शानदार कामगिरी केली होती. तसेच अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या 3 कसोटींमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या सामन्यात 9, दुसऱ्या सामन्यात 8 आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्स मिळवल्या आहेत. तर 106 धावांची शतकी खेळी केली आहे. तर विंडिजच्या काइल मेयर्सने बांगलादेश विरुद्धातील कसोटी पदार्पणातील सामन्यात धमाकेदार द्विशतकी खेळी केली होती. मेयर्सने फेब्रुवारी महिन्यात एकूण 261 धावा केल्या आहेत.
अश्विनच्या अष्टपैलू खेळीमुळे हा पुरस्कार त्याला मिळू शकतो. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अश्विनने मोठी झेप घेतली. अश्विनने गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये 4 स्थानांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ताज्या आकडेवारीनुसार अश्विनचे एकूण 823 रँकिंग पॉइंट्स आहेत. दरम्यान या पुरस्काराची घोषणा 8 मार्चला करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळतो, याकडे क्रिकेट विश्वाच लक्ष असणार आहे.