रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात उत्तम कर्णधार कोण? माजी कर्णधाराने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु, जेव्हापासून रोहित शर्मानं टीम इंडियाच्या कर्णधारपदाची कमान सांभाळली आहे, तेव्हापासून विराट-रोहितच्या नेतृत्वाबाबत विविध मतं मांडली जात असल्याचं क्रीडाविश्वात पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर दोघांच्या नेतृत्वाबद्दल विविध मते मांडल्याचंही अनेकदा समोर आलंय.अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेननं विराट-रोहितच्या नेतृत्वाबाबत मत मांडलं आहे. हुसेन म्हणाला, "विराट कोहली एक आक्रमक कर्णधार होता. पण रोहित शर्मा तुमच्या समोर आल्यावर आक्रमक होणार नाही", हाच या दोघांमधील फरक आहे, असं मला वाटतं."
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना हुसेन म्हणाला, "कोहली रोहितपेक्षा वेगळा आहे. रोहित कोहलीप्रमाणे कधीही आक्रमक वाटणार नाही. त्याची फलंदाजी खूप चांगली आहे. कर्णधार म्हणून रोहितसाठी ही मालिका खूप महत्वाची ठरली. रोहितने स्वत: सांगितलंय की, तो त्याच्या नेतृत्वात बदल करण्याचा प्रयत्न करत राहणार. तो अश्विनला नवीन चेंडू देत नाही. रोहित मैदानात शांत राहून त्याची रणनीती ठरतो."
कसोटी मालिकेत रोहित शर्माची चमकदार कामगिरी
रोहितने इंग्लंडविरोधात सर्वाधिक कसोटी शतक (४) लावणाऱ्या सलामी फलंदाजांच्या क्रमावारीत सुनील गावस्कर यांची बरोबरी केलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून रोहितच्या नावावर ४३ शतक आहेत. या फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर यांच्या मागे आहे. रोहितने इंग्लंडच्या पाचव्या कसोटी सामन्यात १६२ चेंडूत १०३ धावांची शतकी खेळी केली. रोहितने इंग्लंडविरोधात ९ डावांमध्ये ४०० धावा करण्याची चमकदार कामगिरी केलीय.