संरक्षण मंत्र्यांनी केले पुण्यातील नीरज चोप्रा स्टेडियमचे उद्घाटन
भारताचा 'सुवर्णपुत्र' नीरज चोप्रा यांच्या नावाने पुण्यामध्ये स्टेडियमचे उद्घाटन झाले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले आहे. या समारंभाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. या स्टेडियमला 'नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट' असे नाव देण्यात आले आहे.
नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण दलांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. देशातील प्रत्येकाला नीरजच्या कामगिरीचा अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचे संरक्षण दलांनी म्हटले होते. नीरजला १५ मे २०१६ पासून ४ राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे.