कोरोनामुळे आशिया कप 2021 स्पर्धेचं आयोजन रद्द
कोरोना महामारीमुळे आयपीएलला स्थगित मिळाल्यानंतर आता आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट पाहता आयोजकांनी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं.
'करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.' असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.
भारतीय संघाच्या व्यस्त नियोजनामुळे आशिया कपवर अनिश्चिततेचं सावट होतं. भारतीय संघ जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आयोजकांना मोठं नुकसान झालं असतं असंही सांगण्यात येत आहे.