IND-W vs AUS-W : कोरोना बाधित खेळाडू अंतिम सामन्यात उतरली मैदानात
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव झाला. तर सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.लढतीत भारताला २० षटकांमध्ये १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघ १९.३ षटकांमध्ये सर्वबाद १५२ धावा करू शकला.
या सामन्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाने आपली एक खेळाडू करोना पॉझिटिव्ह असूनही तिला खेळण्यासाठी मैदानात उतरवले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या अंतिम सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ताहलिया मॅकग्राला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सामन्यादरम्यानही इतर खेळाडू ताहलियापासून अंतर राखताना दिसले.
एका क्रिकेटच्या वेबसाईटने ताहलिया मॅकग्राचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोमध्ये ती मास्क घालून फलंदाजीला जाण्यासाठी वाट बघताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ताहलिया मॅकग्रा संघातील खेळाडूंपासून दूर बसली आहे. अनेक प्रकारची खबरदारी घेऊन तिला ऑस्ट्रेलियाच्या संघात समाविष्ट केले आहे.” असे ही ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे.