भारत-पाक सामन्यावरून पाकिस्तानमध्ये गोंधळ! कराचीमध्ये पाकिस्तानी युट्यूबरला सुरक्षा रक्षकाने मारली गोळी
T20 विश्वचषक 2024 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. भारताने हा सामना 6 धावांनी शानदार जिंकला. या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहते पुन्हा एकदा निराश दिसले. या मॅचच्या दिवशी पाकिस्तानच्या कराचीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या मॅचवर व्हिडीओ तयार करणाऱ्या एका यूट्यूबरवर एका सुरक्षारक्षकानं गोळीबार केला. हे पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. यूट्यूबर साद भारत पाकिस्तान सामन्यावर लोकांची मते घेत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साद अहमद नावाचा युट्युबर कराचीमधील मोबाईल मार्केटमध्ये गेला आणि त्याने अनेक दुकानदारांचे व्हिडिओ बाइट्स घेतले. यादरम्यान तो एका सुरक्षा रक्षकासमोर आला आणि त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गार्डला रुचले नाही. यानंतर त्याने सादवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. खरे तर समोर मायक्रोफोन ठेवल्याने गार्डला राग आला.
साद अहमदमला गोळी मारल्यानंतर काही काळानंतर सुरक्षा रक्षक भानावर आला. मात्र, तोपर्यंत साद अहमदचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर साद अहमदला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 'जिओ टीव्ही'ने दिलेल्या वृत्तात सादच्या मित्राने सांगितले की, कुटुंबासाठी तो एकमेव कमावणारा व्यक्ती होता. साद विवाहित होता, तो दोन मुलांचा बाप होता. या अपघातानंतर कराचीच्या मोबाईल मार्केटमध्ये गोंधळ उडाला.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आले आहेत. भारतानं 7 वेळा तर पाकिस्ताननं 1 वेळा विजय मिळवला आहे.