'हिटमॅन' रोहित शर्मासह टीम इंडियाचे स्टार खेळाडू वर्षा' निवासस्थानी दाखल, CM शिंदेंनी मुंबईकर खेळाडूंचा केला सत्कार; पाहा VIDEO
टीम इंडियाच कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे या खेळाडूंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी रोहित शर्मासह इतर खेळाडूंचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवनात या चारही खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसच राज्य सरकारकडून या खेळाडूंना पारितोषिकही जाहीर केली जाणार असल्याचं समजते.
टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकल्यानंतर टीम इंडियाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी भारतीय खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केल्यानंतर मुंबईत वानखेडे स्टेडियम आणि मरिन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयी परेड काढली. १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाला भरभरून शुभेच्छा देण्यासाठी शेकडो चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम आणि मरिन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात टीम इंडियाचे खेळाडू मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांशी संवाद साधत होते.
टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उल्लेखनीय कामगिरी केलीय. तीन अर्धशतकांच्या जोरावर रोहितनं टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकवून देण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सुपर ८ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहितने वादळी खेळी करून ४१ चेंडूत ९२ धावा केल्या. तसच सूर्यकुमार यादवनेही चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमारने धावांचा डोंगर उभा करतानाच फायनलच्या सामन्यात डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल पकडला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शिवम दुबेनही काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तर यशस्वी जैस्वालला एकाही सामन्यामध्ये खेळायची संधी मिळाली नाही.