महिला कुस्तीपटूंचा विनयभंग; बृजभूषण सिंह यांच्यावर विनेश फोगाटचे गंभीर आरोप
नवी दिल्ली : राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
बृजभूषण सिंग यांच्या कारभाराविरोधात विनेश फोगट, अंशू मलिक, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह भारताचे कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विनेश फोगट म्हणाली, वर्षानुवर्षे राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचा विनयभंग केला जात होता. त्यांना धमक्याही दिल्या जात होत्या. राष्ट्रीय शिबिरात महासंघाचे विशेष प्रशिक्षक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. आम्हाला महासंघात बदल हवा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला नेहमीच मदत केली आहे, यावेळीही पंतप्रधान मदत करतील, अशी आशा आहे.
बजरंग पुनियाने म्हंटले की, फेडरेशनचे काम खेळाडूंना पाठिंबा देणे, त्यांच्या क्रीडा गरजांची काळजी घेणे आहे. समस्या असेल तर ती सोडवावी लागेल, पण महासंघानेच समस्या निर्माण केली तर काय करायचे? आता लढायचे आहे, आम्ही मागे हटणार नाही, असे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, विनेश फोगटच्या आरोपांवर बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लैगिंक अत्याचार हा गंभीर आरोप आहे. माझं नाव यात आलं असेल तर मी स्वत:च कशी कारवाई करू? मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे, असं बृजभूषण सिंह यांनी म्हंटले आहे.