केंद्र सरकारकडून अर्शदीप सिंह ट्रोल प्रकरणी विकीपीडियाला समन्स
दुबईत काल आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ साठी भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला पार पडला. हा सामना अटीतटीचा ठरला मात्र, या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाकडून अनेक चूका झाल्या. त्यातच अर्शदीप सिंहनं आसिफ अलीची कॅच सोडल्याने तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. दरम्यान, अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवर भारतीय ऐवजी खलिस्तानी असा उल्लेख केल्याचं दिसून आले. या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने विकीपीडियाला समन्स बजावलं आहे.
विकीपीडियावरील माहितीमध्ये छेडछाड
काल भारत पाकिस्तान सामना पार पडल्यानंतर क्रिकेटर अर्शदीप सिंहला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र विकिपीडियावर त्यांचा माहिती सोबत कोणी तरी छेडछाड करत खळबळजनक मजकूर लिहला. त्यामुळे केंद्र सरकारनं विकीपीडियाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली, याची विचारणा करण्यासाठी केंद्र सरकारने समन्स बजावला आहे.
माहितीत करण्यात आला तात्काळ बदल
भारतीय किक्रेटपटू अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवर त्याचा 'खलिस्तानी' असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने यांची दखल घेतल्यानंतर अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती तात्काळ दुरुस्त करण्यात आली आहे. आता ही माहिती कोणी बदलली याचा तपास करण्याचे आव्हान विकिपीडियासमोर आहे.
पाकिस्तानचा या प्रकरणामध्ये हात असल्याची शक्यता?
काल झालेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताला हार पत्करावी लागल्यामुळे , या पराभवाचे खापर अर्शदीप सिंहवर फोडले जात आहे. त्याला अनेक माध्यमातून ट्रोल केले जात आहे. मात्र, काही लोकांकडून यात पाकिस्तानचा कट असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार पाकिस्तानी हॅकर्सकडून करण्यात येत आहे अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. परंतु, याबबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.