Ind vs Eng 2nd Test: टीम इंडियाचा शानदार विजय; दुसऱ्या कसोटी सामन्यात 106 धावांनी हरवले

Ind vs Eng 2nd Test: टीम इंडियाचा शानदार विजय; दुसऱ्या कसोटी सामन्यात 106 धावांनी हरवले

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला आहे. भारतीय संघाने 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. अश्विन 500 कसोटी बळींपासून अजून एक विकेट दूर आहे.

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली. दरम्यान 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएनशच्या स्टेडिअममध्ये होणार आहे.

भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यशस्वी जयसवालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लंड संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com