Shubman Gill: टीम इंडियाला मोठा झटका; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात शुभमन गिल खेळू शकणार की नाही?
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र अद्याप अंतिम वैद्यकीय अहवाल आला नाही. तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली. आता रविवारच्या सामन्यात तो खेळू शकतो की नाही याचा निर्णय आज होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांनंतरच घेण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळू शकला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन किंवा लोकेश राहुलला सलामीला बढती देण्यात येईल.
टीम इंडिया चेन्नईमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. ऑस्ट्रेलियाकडे एडम झम्पासारखा स्पिनर आहे. टीम इंडियाला अडचणीत आणण्याची या गोलंदाजाची क्षमता आहे. त्याने या आधी अनेकदा टीम इंडियाला अडचणीत सुद्धा आणलंय. भारताचे काही फलंदाज स्पिन गोलंदाजी उत्तमपणे खेळतात, शुभमन गिलचा त्या फलंदाजांमध्ये समावेश होतो. त्यामुळे शुभमन गिलच चेन्नईमध्ये खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच आहे. तो खेळला नाही, तर टीमच्या अडचणी वाढतील.