मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट
घोट्याच्या (Ankle Injury) दुखापतीनं त्रस्त असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमन कधी करणार? असा प्रश्न क्रिकेटविश्वात निर्माण झाला आहे. यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. मोहम्मद शमी यावर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या घरेलू कसोटी मालिकेत पुनरागमन करु शकतो, असं शहा यांनी म्हटलं आहे.
जय शहा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "शमीची शस्त्रक्रीया झाली आहे. तो भारतात परतला आहे. बांगलादेश विरोधात होणाऱ्या घरेलू कसोटी सामन्यात शमीचं पुनरागमन होऊ शकतं. लोकेश राहुलला इंजेक्शनची आवश्यकता होती. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दुखापतीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राहुलला क्वाड्रिसेप्स (जांघेतील मांसपेशी) मध्ये वेदना होत असल्याने तो इग्लंडविरोधात झालेल्या चार कसोटी सामने खेळू शकला नाही.
लंडनमध्ये उपचार केल्यानंतर आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्ससाठी खेळण्याची आशा आहे. ऋषभ पंतबाबत बोलताना शहा म्हणाले, पंत आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. तो चांगली फलंदाजी करतो. तसंच किपींगही करत आहे. आम्ही लवकरच त्याला फिट खेळाडू म्हणून घोषित करणार आहोत. जर तो टी-२० विश्वकप खेळला, तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे."