दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल यांची 'सुवर्ण' कामगिरी
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. मिश्र दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हे पदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारताकडून दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जोडीला पराभूत केले.
दीपिका आणि हरिंदर या जोडीने मलेशियाच्या बिंती अजमा आणि मोहम्मद सफिक यांच्याशी कडवी झुंज दिली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने पहिला गेम 11-10 असा जिंकला. यानंतर दीपिका आणि हरिंदर दुसऱ्या सेटमध्ये 9-3 ने पुढे होते. परंतु, मलेशियाच्या जोडीने बॅक टू बॅक पॉइंट घेत गुणसंख्या बरोबरीत केली. येथून हरिंदरने दोन गुण मिळवले आणि दुसरा गेम 11-10 असा जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
दरम्यान, मिश्र दुहेरी स्क्वॉशमधील या सुवर्णपदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 20 झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सुवर्णपदकाच्या बाबतीत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत 16 सुवर्ण जिंकले होते.