Asia Cup: पाकिस्ताविरोधातील पराभवानंतर ट्रोल होत असताना अर्शदीप सिंगची पहिली प्रतिक्रिया
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ साठी भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला पार पडला. हा सामना अटीतटीचा ठरला. मात्र, या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाकडून अनेक चुका झाल्या. त्यातच अर्शदीप सिंहनं आसिफ अलीची कॅच सोडल्याने तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. यातच आता अर्शदीप सिंगची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अर्शदीपचे वडील दर्शन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, “अर्शदीनपे सर्व टीका सकारात्मकपणे घेतली आहे. त्याच्यातील उत्साह कायम दिसत होता. आपण सर्व मेसेज आणि ट्वीटरवर हसत आहोत, मी यातून फक्त सकारात्मक गोष्टी घेणार आहे. या घटनेने माझा आत्मविश्वास अजून वाढला आहे असे त्याचे नेमके शब्द होते”. संपूर्ण भारतीय संघ आपल्या पाठीशी असल्याचं त्याने सांगितलं असल्याची माहिती त्याची आई बलजीत यांनी दिली आहे.
पाकिस्ताविरोधातील सामन्यात १८ व्या ओव्हरला अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर शेवटच्या षटकात पाकिस्तानला जिंकण्यासाठी सात धावांची गरज असताना अर्शदीप सिंगकडे गोलंदाजीची जबाबदारी होती. पण पाकिस्तानने पाच गडी आणि एक चेंडू राखत सामना जिंकला.