रवींद्र जडेजाने रचला इतिहास! कपिल देवसोबत 'या' खास क्लबमध्ये सामील
नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आशिया चषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 200 वनडे विकेट पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. या सामन्यात जडेजाने शमीम हुसेनची विकेट घेत ही कामगिरी केली. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण करणारा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. याशिवाय, जडेजा हा कपिल देवनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे ज्याने वनडेमध्ये 200 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेऊन 2000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आतापर्यंत अनिल कुंबळेच्या नावावर आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 334 विकेट घेतल्या आहेत. यानंतर हरभजन सिंगचे नाव २६५ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजा 200 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय रवींद्र जडेजा हा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्यानंतरचा दुसरा अष्टपैलू खेळाडू बनला आहे ज्याने वनडे फॉरमॅटमध्ये बॅटने 2000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 200 विकेट्स घेण्यासही यश मिळवले आहे. जडेजाने आपल्या 182 एकदिवसीय सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. आतापर्यंत जडेजाने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये चेंडूसह ३६.८५ ची सरासरी पाहिली आहे. जडेजाने आतापर्यंत भारताकडून कसोटीत 275 आणि टी-20मध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, आशिया चषकात भारत विरुध्द बांगलादेश सामना सुरु आहे. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमावून 265 धावा केल्या आहेत. भारतासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान आहे. शाकिब अल हसनने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. शार्दुलने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी घेतले.