मराठमोळ्या अमोल मुजुमदारची भारतीय महिला टीमच्या हेड कोचपदी निवड
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मराठमोळ्या अमोल मजुमदार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. बोर्डाने बुधवारी आज ही घोषणा केली. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने मजुमदार यांची मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड केली.
अमोल मजुमदारने आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30 शतकांसह 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मुजुमदार हे 100 हून अधिक लिस्ट ए गेम्स आणि 14 टी-20 सामन्यांमध्येही दिसले होते. त्यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आणि नंतर आसाम आणि आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.
अमोल मजुमदार म्हणाले, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यामुळे मला अत्यंत सन्मानित वाटत आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि टीम इंडियासाठी माझ्या व्हिजन आणि रोडमॅपवर विश्वास ठेवल्याबद्दल मी सीएसी आणि बीसीसीआयचे आभार मानतो. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रतिभावान खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास आणि त्यांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी योग्य तयारी आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास उत्सुक आहे. पुढील दोन वर्षे खूप महत्त्वाची आहेत कारण या काळात दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.