मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! आयपीएल सुरु होण्यापूर्वीच 'हा' दिग्गज खेळाडू संघातून बाहेर
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 17वा सीझन सुरु होण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. 22 मार्च (शुक्रवारी) आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. मंगळवारी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये सूर्या फेल झाला.
सूर्यकुमार आयपीएलपर्यंत तंदुरुस्त होऊ शकतो असे चाहत्यांना वाटत होते. परंतु मंगळवारी एनसीएमध्ये फिटनेस चाचणी झाली आणि सूर्याला फिटनेसवर आणखी लक्ष घालण्याची आवश्यकता असल्यााच निष्कर्ष काढण्यात आला. सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. या मालिकेदरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. आता त्याला मैदानात परतण्यासाठी एनसीएकडून ग्रीन सिग्नल घ्यावा लागणार आहे. पुढीच चाचणीत सूर्या फिट सिद्ध होईल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.
सूर्यकुमार यादव या सीझनमध्ये खेळणार की नाही अशी चर्चा सुरू असताना स्वत: सूर्याकुमार यादवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसला एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये SKYने तुटलेले हृदय टाकले आहे. त्याच्या या पोस्टवरून आता चाहत्यांची धाकधुक आणखी वाढली आहे.
सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएलचे 11 सीझन खेळले आहेत. सूर्याने आयपीएलमध्ये एकूण 139 सामने खेळले असून त्यात त्याने 143 च्या स्ट्राइक रेटने 3 हजार 249 धावा केल्या आहेत. IPLमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 21 अर्धशतके आहेत.