मिस्टर ३६० डिग्रीने केली निवृत्तीची घोषणा
मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळख असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिलीय.आपण या पुढे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार नसल्याचं डिव्हिलियर्सने जाहीर केलं होतं.
हा प्रवास फार भन्नाट होता मात्र मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय, अशी आपल्या पोस्टला सुरुवात करत डिव्हिलियर्सने सर्व चाहत्यांचे आभार मानलेत. "अगदी अंगणामध्ये माझ्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळण्यापासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने खेळतो. आता वयाच्या ३७ वर्षी ती (उत्साहाची) ज्वाला त्याच तेजाने तेवत नाही. हे सत्य आहे आणि मला याचा स्वीकार करायलाच हवा. हे अचानक वाटत असलं तरी तसं नाहीय. म्हणूनच मी आज ही (निवृत्तीची) घोषणा करतोय," असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
"क्रिकेट हा खेळाने मला कायमच फार मायेनं जवळ केलं आहे. मग ते टायटन्ससाठी खेळणं असो, दक्षिण आफ्रिकेसाठी किंवा आरसीबीसाठी असू किंवा जगात कुठेही असो, या खेळाने मला विचारही करता येणार नाही असे अनुभव आणि संधी दिल्या. यासाठी मी कायमच आभारी राहीन," असं डिव्हिलियर्स म्हणालाय.
"मला माझ्या सर्व संघ सहकार्यांचे, विरोधी संघातील खेळाडूंचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे, प्रत्येक फिजिओचे आणि प्रत्येक स्टाफ मेंबरचे आभार मानाचे आहेत ज्यांनी माझ्यासोबत हा प्रवास केला. मला दक्षिण आफ्रिका आणि भारताबरोबरच जगभरामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलो तिथे मिळालेला पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो," अशा भावनिक शब्दांमध्ये डिव्हिलियर्सने सर्वांचे आभार मानलेत.
"अगदी शेवटी हे सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाशिवाय, तडजोडींशिवाय हे सर्व शक्य नव्हतं याची मला जाणीव आहे. माझे पालक, माझे भाऊ, माझी पत्नी डॅनिली आणि माझी मुलं. आता मी माझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीकडे फार आशेने पाहत आहे ज्यात मी त्यांना प्राधान्य क्रमावर ठेवणार आहे," असं म्हणत डिव्हिलियर्सने क्रिकेटचा निरोप घेतलाय.