37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेद्वारे यजमान म्हणून इतिहास रचण्यासाठी गोवा सज्ज
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत गोवा येथे होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री, गोव्याचे क्रीडा सचिव आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गोवा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद भूषवण्यास सज्ज आहे. या स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. हा प्रतिष्ठित कार्यक्रम अॅथलेटिक उत्कृष्टतेचे नेत्रदीपक प्रदर्शन, सौहार्द आणि अनेक रोमांचक खेळांच्या पदार्पणासाठी एक व्यासपीठ असेल. गुजरातमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांच्या मागील आवृत्तीत 36 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. केरळमध्ये झालेल्या 2015 मधील आवृत्तीत 33 खेळांचा समावेश होता, असे प्रमोद सावंतांनी म्हंटले आहे.
गोव्यात भरभराट करणारी क्रीडा परिसंस्था निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पर्यटकांनी आमच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटला असताना, आता जगभरातील क्रीडाप्रेमींना आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे. आयर्नमॅन, जागतिक स्तरावरील अॅथलीट्स आणि २२ देशांतील सहभागींसह जागतिक टेबल टेनिस इव्हेंट सारखे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले आहेत. राष्ट्रीय खेळांसाठी विकसित केलेल्या आमच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह आम्ही क्रीडा संघटना आणि राष्ट्रीय महासंघांना या सुविधा त्यांच्या इव्हेंटसाठी वर्षभरात वापरण्यासाठी आमंत्रित करतो, असे ते म्हणाले आहेत.
ऑलिम्पिकच्या धर्तीवर होणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हा एक मल्टीस्पोर्ट इव्हेंट असून त्यात देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा सहभागी होतील. ही स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. हा कार्यक्रम राज्यभरातील अनेक ठिकाणी असेल. उल्लेखनीय म्हणजे, सायकलिंग आणि गोल्फ खेळांच्या स्पर्धा दिल्लीत होणार आहेत. विशेष म्हणजे, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बीच फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, सेपकटक्रा, स्काय मार्शल आर्ट्स, कल्ल्यारापट्टू आणि पेनकॅक सिलाट आदी खेळांचा राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण होणार आहे.
याव्यतिरिक्त, नौकानयन आणि तायक्वांदो मागील आवृत्तीत वगळल्यानंतर पुनरागमन करत आहेत. शिवाय, परंपरा साजरी करण्यासाठी लगोरी आणि गतका या खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.