टीम इंडियातील महाराष्ट्राच्या 'या' 4 किक्रेटपटूंना प्रत्येकी 1 कोटीचे बक्षीस
विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह बक्षिसांचाही वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेले महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना उद्या राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. शुक्रवारी विधीमंडळात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून त्यावेळी बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विजयी टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाले असून वानखेडे स्टेडिअमवर त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ही रक्कम शुक्रवारी जाहीर करणार आहेत.
मुंबईत गुरुवारी सायंकाळी टीम इंडियाचे आगमन झाले, त्यावेळी त्यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी उसळली होती. क्रिकेटप्रेमींनी भारत माता की जय, टीम इंडियाचा विजय अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण देशप्रेमाने भारावलेले दिसले. जिकडे तिकडे क्रिकेटप्रेमी आणि भारतीय संघाच्या स्वागताला जमलेले क्रिकेट चाहते दिसून आले. मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील गर्दी पाहता मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन करीत क्रिकेटप्रेमींनी इकडे फिरकू नये, असे आवाहन केले.
वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला असून या ठिकाणी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी रात्री हा भव्यदिव्य सोहळा रंगला. यावेळी वानखेडे स्टेडिअम खचाखच भरले होते.