धक्कादायक। पाच वर्षाच्या मुलाला पित्याने फेकले पंचगंगा नदीत
कबनूर येथील एका निर्दयी पित्याने औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने आपल्या पोटच्या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत फेकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारची त्याने स्वतः पोलिसांसमोर कबुली दिली तेव्हा ही घटना उघडीस आली. अफांन सिकंदर मुल्ला असे मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा शोध घेणे सुरु आहे .गेल्या दोन महिन्यात ही तिसरी घटना असून या घटनेमुळे पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे.
यासंदर्भात पोलिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर मुल्ला हा अपंग असून त्याला दारूचे व्यसन होते. मिळेल तिथे मजुरीचे तो काम करतो, त्यामुळे अनेकवेळा तो घराच्या बाहेर असायचा. त्याला दहा वर्षाची एक मुलगी आणि अफान हा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादामुळे सिकंदर गेल्या काही दिवसांपासून बाहेर होता. अफानला आकडीचा आजार होता. त्यामुळे औषोधोपचाराला खर्च यायचा आणि हा खर्च सिकंदरला झेपत नव्हता. त्या रागापोटी त्याने मुलाला नदीत फेकले.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावूया, असे सांगून वडील सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही अफान सापडत नसल्याने नातेवाईक व नागरिकांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी करता त्याने अफानला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी अफान याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधारामुळे शोध थांबवून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा त्याचा शोध सुरू आहे.