कोव्हिशिल्डची दुसरी लस आता ८४ दिवसांनी मिळणार
कोव्हिशिल्डची पहिली लस घेतलेल्यांना आता दुसरी लस ८४ दिवसांनी मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा कालावधीमध्ये पुन्हा बदल केला आहे. तसेच पहिल्या डोससाठी करण्यात आलेली नोंदणी ही दुसऱ्या डोससाठी सुद्धा लागू असणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिन डिजिटल पोर्टलवर बदल केले आहेत. त्यामुळे आता कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांआधीच ज्यांना नोंदणी केली होती त्यांना लसीकरण केंद्रावरून परत पाठवण्यात येत आहे. कोव्हिन पोर्टलवर ज्यांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नोंदणी केली आहे ती नोदंणी दुसऱ्या डोससाठी सुद्धा ग्राह्य ठरणार आहे.डॉ. एनके अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्किंग ग्रुपने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसची मुदत १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे १३ मे पासून हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या कालावधीमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या चार ते सहा आठवड्यांपर्यंत घेता येणार आहे.