बुरख्याचा वाद पेटताच मुख्यमंत्र्यांकडून शाळा-महाविद्यालयंच बंद!
कर्नाटकात (Karnataka) बुरख्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयात बुरखा (Hijab) घालून येण्यास अनेक ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींमध्ये रोष वाढू लागला आहे. तर दुसरीकडे भगवं उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांकडून बुरखाबंदीच्या समर्थन केलं जात आहे. हे विद्यार्थी आणि बुरखा घातलेल्या विद्यार्थीनी समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाल्याच्या घटनाही घडत आहेत.
दरम्यान दररोज शाळा (School) व महाविद्यालयांमध्ये (Colleges) वादाचे प्रसंग घडत असून तणावाचे वातावरण आहे. संपूर्ण राज्यात हे लोण पसरले असल्याने राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मंगळवारी मोठा निर्णय घेतला.
राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी मंगळवारी राज्यातील शाळा व महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करावी लागली. बोम्मई यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच महाविद्यालयांमध्ये पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मंगळवारी कर्नाटकातील एका महाविद्यालयत तर बुरखा घातलेली मुस्लिम विद्यार्थिनी भगवं उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला एकटीच भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही विद्यार्थिनी महाविद्यालयात आपली दुचाकी पार्किंगमध्ये लावून वर्गाकडे निघाली होती. त्याचेवळी घातलेल्या विद्यार्थ्यांनी जोरजोरात जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.